ऋतुराजाची मुहूर्तमेढ
" रसरंगांची करीत उधळण मधूगंधाची करीत शिंपण चैतन्याच्या गुंफीत माला रसिकराज पातला आला वसंतऋतु आला वसुंधरेला हसवायला , सजवीत , नटवीत लावण्याला आला वसंत ऋतू आला " गीतकार शांताराम आठवले यांनी शब्दबद्ध केलेले , प्रभाकर जोग यांच्या संगीतासह आशा भोसले यांनी सुरबद्ध केलेले ‘आला वसंत ऋतू आला’ या गाण्याचे वरील बोल कानावर पडले अन मन मंत्रमुग्ध झाले . चैत्रारंभाची किंचितशी चाहूल मन मोहरून टाकते . फाल्गुन महिन्यात होळी आणि रंगपंचमी होऊन गेली असल्याने अगोदरच आपली मने उल्हासित झालेली असतात . चैत्रापासून ऊनही तेजाळून निघते . चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही , तर त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते . झाडांना पल्लवित करणारी आणि आणि फळांना गोडवा आणणारी . चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद उतरते आणि मग आपणाकडे येते . अशा या वसंताची मुहूर्तमेढ म्हणजे गुढीपाडवा . यालाच विजय पाडवा असेही म्हणतात . ग्रेगरियन दिनदर्शिकेप...