सफरनामा भाग - १
“ झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया ” ग . दि . माडगूळकरांच्या लेखणीतून अवतरलेले हे बालगीत आपल्या सुवर्णकाळाचा एक अविभाज्य भाग होते . सुट्ट्यांमध्ये हे गाणे बडबडत मामाच्या गावाला जाण्यात एक वेगळेच सुख होते नाही का! भलेही प्रवास कसाही असो . हे रेल्वेने जाण्याचे स्वप्न मात्र मोठेपणी साकार झाले असले तरीही चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद मात्र तोच होता बरे! तर ही आहे माझ्या पहिल्या वाहिल्या रेल्वेप्रवासाची कथा . साहित्यिक भाषेत प्रवासवर्णन हो . तर ह्या प्रवासाचे नियोजन झाले फक्त दोन दिवस आधी . अर्थातच एकच आरक्षणाचा पर्याय शिल्लक होता तो म्हणजे तात्काळ आरक्षण . बरोबर अकरा वाजण्यास अवघे काही मिनिटे बाकी असताना हातातल्या दुरभाष यंत्राला नमस्कार करून त्यावरील आभासी खिडकीवर जाऊन अकरा वाजण्याची वाट बघत होतो . एवढ्या रामकथेला फळ मिळाले तिकीट आरक्षित झाल्याचा मिळालेला संदेश पाहून . प्रवासाचा दिवस उजाडताच उरले सुरले स...