सफरनामा भाग - १

 

“ झुक झुक झुक झुक अगीनगाडी

धुरांच्या रेघा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया ”

                 .दि. माडगूळकरांच्या लेखणीतून अवतरलेले हे बालगीत आपल्या सुवर्णकाळाचा एक अविभाज्य भाग होते. सुट्ट्यांमध्ये हे गाणे बडबडत मामाच्या गावाला जाण्यात एक वेगळेच सुख होते नाही का! भलेही प्रवास कसाही असो. हे रेल्वेने जाण्याचे स्वप्न मात्र मोठेपणी साकार झाले असले तरीही चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद मात्र तोच होता बरे! तर ही आहे माझ्या पहिल्या वाहिल्या रेल्वेप्रवासाची कथा.  साहित्यिक भाषेत प्रवासवर्णन हो.

             तर ह्या प्रवासाचे नियोजन झाले फक्त दोन दिवस आधी. अर्थातच एकच आरक्षणाचा पर्याय शिल्लक होता तो म्हणजे तात्काळ आरक्षण. बरोबर अकरा वाजण्यास अवघे काही मिनिटे बाकी असताना हातातल्या दुरभाष यंत्राला नमस्कार करून त्यावरील आभासी खिडकीवर जाऊन अकरा वाजण्याची वाट बघत होतो. एवढ्या रामकथेला फळ मिळाले तिकीट आरक्षित झाल्याचा मिळालेला संदेश पाहून. प्रवासाचा दिवस उजाडताच उरले सुरले सामान बांधून पोचले एकदाची रेल्वेस्थानकावर. वेळेत पोचून आरक्षित केलेल्या शयनयानाच्या बोगीत जाऊन सामान व्यवस्थित ठेवले. आणि हाच तो पहिल्या रेल्वेप्रवासाचा श्रीगणेशा.

              प्रवासाला सुरुवात होताच अलगद ओठांवर येणारे बाप्पाचे नाव आणि सुखकर प्रवासाची प्रार्थना नकळत देवाकडे केली जाते. रात्रीचा प्रवास असल्याने अर्थातच खिडकीतून रस्ता बघता येणार नव्हता. सोबत आणलेली खाऊची शिदोरी मित्र-मैत्रिणींबरोबर फस्त करून आमच्या छान गप्पा-गाणी रंगली. पण हळूहळू रस्त्यातल्या स्थानकांवर गर्दी वाढत गेली आणि आम्ही आपापल्या जागांवर गुडूप झालो. पण आता खरी मजा येणार होती ती प्रवासात भेटलेल्या प्रवाशांना अनुभवण्यात. मस्तपणे आपल्या जागेवर बसून मी बोगीत उडालेली धांदल मी बघत होते.

            प्रवासी म्हणजे कोण तर आपल्यासारखेच कोणीतरी एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाणारे. त्या प्रत्येकाची वेगळी कहाणी. प्रत्येकाचे निराळेच अनुभव. कोणी चार पावसाळे बघितलेले तर कोणी पहिल्या पावसाची वाट बघणारे. कोणी आपल्या जिवलग आप्तेष्टांना भेटायला चाललेले तर कोणी प्रियजनांना. कोणी विरहाच्या दिशेने तर कोणी मिलनाच्या. अशा असंख्य तऱ्हेचे प्रवासी बघायला मिळतात.

               एखादे कुटुंब सहलीला जात असते. मस्त मजा करत जाणारे ते आप्तजन घरून निघतांना झालेले भांडण विसरलेले असतात. एखादे नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी जात असते. त्यांची अन कुटुंबियांची चर्चा म्हणजे पूर्ण पार पडलेल्या कार्याचा आढावा आपल्याही कानांवर येऊन पडतो. मधेच एखादे भोंगा पसरलेले लेकरू अन त्याची वैतागलेली आई नजरेस पडते. कोणी नोकरीच्या निमित्ताने फिरणारे असते तर कोणी नोकरीच्या शोधात. कोणी नाईलाज म्हणून प्रवास करणारे तर कोणी छंद म्हणून. कोणी सरलेल्या भूतकाळातील आठवणींची शिदोरी सांभाळणारे तर कोणी नवी स्वप्ने रंगावणारे.  भारतीय रेल्वेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे एकच दळणवळणाचे असे साधन असे आहे जिथे सर्व आर्थिक स्तरांतील लोक आपला स्तर बाजूला ठेवून सुरक्षित असा प्रवास इच्छित असतात.

           प्रवासात असेच काही सहप्रवासी भेटतात. अगदी थोड्या अवधीत ते मावशी, काका, दादा बनून जातात. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपण नकळत त्यांच्या भावना समजून घ्यायला लागतो अन एक वेगळीच आपुलकी निर्माण होते. रेल्वेत बसताना ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते, उतरतांना अगदी मनापासून आपण त्यांचा निरोप घेतो. काही ओळखी अशा निर्माण होतात ज्या आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करतात. एकंदर काय तर वेगवेगळा दृष्टीकोन असलेल्या माणसांना आपण भेटतो. एरव्ही विरुद्ध स्वभावाच्या माणसाला साधा नमस्कार न घालणारे आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो.  सहप्रवाशाची मानसिकता समजून घ्यायला लागतो. काहींच्या गोष्टी मन हळवे करतात तर काहींच्या प्रेरणा देतात.

              काय यार ही गर्दी? कधी संपणार हा प्रवास? इथपासून ते आता थांबायलाच नको प्रवास असा विचार मनात येणे हेच तर खरे प्रवास सुफलतेचे प्रतीक. आपल्या थांब्यावर उतरतांना मन जड होते. एकमेकांना निरोप देताना एक वेगळीच भावना मनाला अस्वस्थ करते. सहप्रवासी आयुष्यात परत भेटतील की नाही हे माहीत नसतांनाही त्यांच्यासोबत घालवलेली ती वेळ एक वेगळेच समाधान देऊन जाते. त्यावेळी चेहऱ्यावर तरळणारे हसू मात्र प्रवासाची साठा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण करून  जाते.                              

                                     

                                                                                                                                         ©वृषाली आघाव

Comments

Popular posts from this blog

ती….

प्रारंभ