प्रारंभ
सूर्यास्त… दिवसभराच्या धांदलीतून शांततेची अनुभूती देणारा
एक विलक्षण अनुभव. मनातल्या वादळाला किनारा दाखवणारा आणि मनातल्या
आशा-आकांक्षांना नव्याने बहरण्यासाठी एक हलकीशी रात्र
नावाची विश्रांती देणारा असा हा सूर्यास्त. पण आज जरा वेगळाच
भासला. कारण हा २०२२ या वर्षाला अस्ताकडे नेत होता, जेणेकरून २०२३ आपले किरण या जगतावर पसरवण्यासाठी
जणूकाही त्याच्या कालरथावर आरूढ होईल. प्रत्येक दिवस जसा
एक नवा अनुभव देत आपल्याला जगायला शिकवतो, तसेच सरते वर्ष आपल्याला
घटित घटनांचा आढावा घेत पुढे जायला शिकवते.
आयुष्याच्या निरनिराळ्या
स्तरांमध्ये निरनिराळी पण अनुरूप अशी शिकवण प्रत्येक सरते वर्ष आपल्या पदरात टाकून
अनुभवांचा बांध घालत असते. परंतु आपल्या झोळीची क्षमता
आणि योग्यताच आपल्याला त्या शिकवणीतून शिकायला भाग पाडते. घडलेल्या वाईट गोष्टी जगणे सावरायला शिकवतात. आणि चांगल्या गोष्टी जगण्याची एक नवीन उभारी देतात. मनाला प्रोत्साहित करतात. ‘आयुष्य आहे चालायचंच’ असे म्हणत सुख:दु:खाचा हा ऊनसावलीचा खेळ एक
नवीन उमेद देतो. क्षितिजाने पसरलेल्या अजस्त्र बाहुंपर्यंत पोहचविण्यासाठी
प्रोत्साहित करतो. वर्ष सरते पण आठवणींचा अमूल्य
ठेवा आपल्याला देऊन जाते. नेहमीप्रमाणेच सरते वर्ष अनेक
गोष्टी शिकवून गेले.
“ शोध साऱ्या तुझ्या तूच वाटा
हो किनारा तुझा तूच आता
जगुनी घे जरा सांगतो क्षण
हा आजचा”
भविष्याची चिंता करत
बसण्यापेक्षा वर्तमानाला उत्तम बनवत भविष्य सुरक्षित करणे जास्त महत्वाचे असते अशी
अनमोल शिकवण या वर्षाने दिली. आणि अर्थातच सुरुवात छान झालीच
की! मध्यंतरीच्या काळात चाललेल्या ऊनसावलीच्या खेळाने माणसे ओळखायला शिकवली. नात्यांमध्ये एक ओलाव्याचा नाजूक धागा अगदी अलगद
ओवला गेला. आणि महत्वाचे म्हणजे हा धागा भरकटणाऱ्या मनाला शांत
करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतो बरं का! आजूबाजूच्या परिसरात सभोवतालच्या समाजात
घडणाऱ्या अनेक घटनांनी एक नवीन दृष्टिकोन दिला. समजूतदारपणाची एक
नवी व्याख्या समजावली. आयुष्यात मोठे होत अंगावर
येणाऱ्या जबाबदाऱ्या माणसाला जबाबदार बनवतात, परंतु आयुष्यात घडणाऱ्या
घटनांची साखळीच जणू त्या जबाबदऱ्यांची आठवण करून देते नाही का!
वेळ आणि प्रसंग अनेक विस्मयकारक जाणीवा करून देतात. कदाचित पदोपदी ते जगण्याचा नवीन अर्थ आपल्यासमोर उलगडत असावेत.
आयुष्यात घडलेल्या सुखद घटनांनी स्वतःला ओळखायला शिकवले. क्षितिजाला स्पर्श करण्याची
एक नवी जिद्द दिली. मनाला खंबीर करायला हातभार लावला आणि अजूनही बरेच काही…….
ही सगळी अनुभवाची झोळी मनाच्या गाठीला बांधुन नव्या वर्षात नव्या स्वप्नांसह नवीन उमेदीने एक नवी सुरुवात अतिशय सुखकर होऊन जाते. नव्या क्षितिजावरची नवी सुर्यकिरणे नवा उल्हास पसरवत नव्या वाटा, नवी आव्हाने नव्याने आयुष्याकडे बघायला शिकवतात. सगळे काही नवीन असले तरी जुनी नाती, जुन्या आठवणी, जुनी मैत्री आणि सरत्या वर्षात मिळालेला अनुभवांचा ठेवा जपत एक नवी सुरुवात करणे आणि नव्या नवलाईच्या नवपालवीला गोंजारत एक नवा श्रीगणेशा हाच एक नववर्षाचा प्रारंभ असावा नाही का!
© वृषाली आघाव
🔥💖
ReplyDelete