ती….
" यत्र नार्यस्तु पुज्यते रमन्ते तत्र देवता "
जिथे तिचा सहवास आहे तिथेच देवाचा वास. कोण आहे ती? तर ती आहे अनदिकालाची उत्पत्ती अन अनंतकालाची सृजनशीलता, आदिशक्ती !
आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जिने भगवंताच्या स्थानी जन्म घेतला. तिच्यासाठी असणारा हा खास दिवस. जिच्यामुळेच आपला प्रत्येक श्वास आहे. तिच्यासाठी खास एक दिवस असणे ही खरेतर आपल्यासाठी शोकांतिका आहे. तिला तिचा सन्मान बहाल करायला एका खास दिवसाची का गरज पडावी. नवरात्रीचे नऊ दिवस तिला मखरात बसवणे आणि या एकाच दिवशी तिचा सन्मान व्हावा का ? जो तिला रोज मिळायला हवा.
ती सर्वगुणसंपन्न आहे. अष्टपैलू आहे. तिला तिचे स्थान द्यायला दिवस नेमायची गरज का भासावी. याचा सारासार विचार नक्कीच करायला हवा. ती स्वतः उत्पत्ती आहे, जन्मदात्री आहे, सहचारिणी आहे आणि तरीही तिच्या अढळ स्थानाला धक्का म्हणजे आपण माणूस म्हणून कुठेतरी नक्कीच कमी पडतोय. ती सौंदर्याची खाण आहे, अपादमस्तक अशी सुंदरता अन सहनशीलता आहे. उगाच नाही कवीमनाला इतकेच काय तर प्रत्यक्षात भगवंताला तिची भुरळ पडत. तिच्या बांधलेल्या केसांत संपूर्ण सृष्टीला बांधून ठेवण्याचे सामर्थ्य असते. तिच्या नजरेतला दरारा शब्दांचे कार्य पार पाडतो. तिच्या हातांमध्ये नाजूकपणाबरोबरच योध्याचे बळ असते.अशा देवीचे वर्णन शब्दांत सहजशक्य नाहीच.
जबाबदारी आणि कर्तृत्वाची उत्तम सांगड फक्त तीच घालू शकते. तिच्या फक्त असण्याने या सृष्टीला बहार आहे. तिच्या फक्त अस्तित्वाने विश्वचक्र स्थिरस्थावर आहे. तिचे असणे काय असते हे त्यांना विचारा ज्या घरात ती नाहीये. तिला गरज नाहीये की कोणी तिचा आदर करावा, तिला डोक्यावर घेऊन मिरवावे. ते तिच्या कर्तृत्वाने मिळवतेच हो. गरज आहे ती फक्त आपल्या छोट्या प्रयत्नांची. एकदा फक्त थोडेसे कौतुक करून बघा ती स्वतः ला विसरून तुमच्या सेवेत समर्पित होईल. इतकेच प्रयत्न की ती कोपणार नाही. नाहीतर तिच्या कोपाचा परिणाम तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेच.
समाजातले तिचे अढळ स्थान साक्षात देवही हिरावून घेऊ शकत नाही. गरज आहे समाजाने स्वतः आरशात बघण्याची. तिच्या परिवर्तनाला सनातनी रुढीप्रमाने विरोध करणार्यांनी एकदा स्वतः सनातनी आहात का ते बघावे. एखादी दुःखद घटना घडल्यानंतर काही काळ शोकाचे वातावरण असते. समाजाच्या सर्व स्तरांतून आवाज उठवले जातात. पण हाच समाज तिला नंतर स्वीकारताना रूढी-परंपरांच्या नावाखाली निरर्थक अशा आडोशाचा आधार शोधतो आणि तिथेच माणुसकी गुदमरते. पण ती तशी नाही. ती क्षमाशील आहे. सर्व लेकरांचे पाप पोटात घालून ती नेहमीच तिच्या कर्तव्यपथावर तत्पर असते. कारण ती फक्त तीच असू शकते.
या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात सगळे काही कृत्रिम पद्धतीने तयार करताही येईल कदाचित. पण बिशाद आहे कोणाची ज्याने तीच वात्सल्य, सहनशीलता, क्षमाशीलता हे कृत्रिमरित्या बनवण्याचे धाडस करावे. ती तीच आहे तीच राहील हे अद्वितीय असे त्रिकालसत्य आहे.
अंतिम सर्वस्व फक्त आणि फक्त तीच ………..
Comments
Post a Comment