प्रवास

  

       प्रवास...... व्याखिक भाषेत सांगायचे झाल्यास प्रवास म्हणजे स्थानांतरण. अर्थातच एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणे म्हणजेच प्रवास. मग हा प्रवास कसाही आणि कुठलाही असो सतत चालूच असतो. या प्रवासाला कारणेही असू शकतात, जसे की कामानिमित्ताचा प्रवास, गावी जाण्यासाठीचा प्रवास, इति. प्रवास करणे एखाद्याचा छंदही असतो.    असा हा प्रवास प्रवासमार्गात क्षणागणिक नवीन गोष्टी उलगडत जातो.

              आपले  आयुष्यही पण एक प्रवासच नाही का! जो प्रवास जन्माआधी सुरू होतो आणि गंतव्याच ठिकाण म्हणजे मृत्यू.  जन्मापासून मृत्युपर्यंतची वाटचाल म्हणजे प्रवासमार्ग. म्हणूनच कदाचित माणसाला प्रवासी अशी उपमा दिली असावी.   

              प्रवासाच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं नाव घेत प्रवास सुखकर व्हावा अशी आशा व्यक्त केली जाते. हेतू इतकाच की प्रवासात मनाला शांतता लाभावी. मानवी सकारात्मकतेचे स्पष्ट चित्रण असते हे. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या डौलदार झाडांनी तयार केलेल्या कमानीतून डोकावणारा सूर्य जणू त्याच्या आगमनाची सूचना देत असतो. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराला भेदण्यासाठी सूर्याचा एक किरणही पुरेसा असतो. जणूकाही संकटावर मात करत येणारी आव्हाने पेलताना सामर्थ्यासाठी आशेचा एक किरणही पुरेसा ठरतो असेच तो सांगत असेल. आजूबाजूची पळणारी झाडे मन शांत करत जातात. कोणी कोणासाठी थांबत नसते, आपली वाट आपणच चालायची असते असा ते सांगत असतात. निसर्गाची दिसणारी विविध रूपे आयुष्याच्या रंगांची ओळख करून देतात. हिरवीगार गवते, शेते, ओसाड माळराने, उजाड शेते आयुष्यातील चढ-उतारांसारखेच असतात नाही का? पण तरीही दुष्काळी भागातही आपली मुळे लांबवर पसरवून पाणी शोधून तग धरून राहिलेले झाड खंबीरपणे उभे राहायला शिकवतेनिसर्गाची मोहक दृश्य बघत प्रवास करायला मिळणे आनंदाची पर्वणीच नाही का?

              रस्त्यात भेटणारी माणसेही खूप काही शिकवून जातात. प्रत्येकाची वेगळी कहाणी, प्रत्येकाच्या वेगळ्या अडचणी असतात. तरी प्रवासात सगळं काही विसरून ते नव्या आव्हानाला भिडायला अगदी सावरून तयार असतात. रोज कामाच्या ठिकाणी येऊन जाऊन करणारे दिवसभराचा कामाचा ताणही या गर्दीत विसरून जात असतील ना! आपण दिलेला एक आधाराचा शब्द कित्येकांचे प्रवास आनंददायी बनवून जातात.  जर एखादे छोटे बाळ रडत असेल तर सगळे स्वतःला विसरून त्याला नदी लावतात. जर एखादे आजोबा आपल्यासोबत असतील तर त्यांच्या गोष्टी ऐकत प्रवासाचा ताण कुठल्या कुठे नाहिसा होतो. प्रवासाच्या सुरुवातीला सगळे अनोळखी वाटणारे चेहरे ओळखीचे होऊन जातात. एक वेगळाच बंध तयार होतो. प्रत्येकाच आयुष्य, जीवन जगण्याची पद्धत, प्रांतांनुसार  बोलीभाषेत पडणार फरक, प्रत्येकाचे स्वभाव सगळं काही वेगळे असते. तरीही एक आपुलकीच वातावरण तयार होते की नाही? आयुष्याचेही असेच असते. कुटुंबात राहताना प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, आवड वेगळी तरीही एकमेकांची काळजी करायला सगळे तत्पर. सुखदुःखात सगळे एकत्र. भारतीय संस्कृतीचे हेच तर वैशिष्ट्य आहे. या संस्कृतीला अजून महान बनवताना आपल्याला द्वेष, राग, मत्सर काढायला हवा ना! सगळ्यांचे आयुष्य सुकर होईल की मग. हसत खेळत जगायला शिकवतो असा हा प्रवास.

              प्रवासात एक गोष्ट कधी अनुभवली का? जेव्हा आपण प्रवास सुरु करतो तेव्हा आपल्या डोक्यात खूप विचार चालू असतात.एक टप्पा असा असतो की आपले पूर्वायुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून जाते. मनात भावनांचा कल्लोळ माजतो. आपण हरवून जातो. पण मग एखाद्या छोट्या धक्क्याने किंवा आवाजाने आपण त्या विश्वातून बाहेर येतो. वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. मग एका टप्प्यात आपण सगळे काही विसरून प्रवासाचा आनंद घेत असतो. खऱ्या वर्तमानात जगत असतोतेव्हा ना भूतकाळाचा विचार ना भविष्याची चिंता. मन वेगळीच शांतता अनुभवते. मग हळू हळू एक एक गोष्टीचा शांतपणे विचार केला जातो. आणि काही प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडतात. आणि आपण नव्या आव्हानाला नव्या जोमाने पेलायला तयार होतो. हा जो क्षण असतो ना तो खूप खास असतो. तो अनुभवयलाच हवा.

              असा हा प्रवास आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. जगणंच हरवून बसलेल्या माणसाला जगायला शिकवतो. भूतकाळाचा विचार सोडून देत येणारे काम विचारपूर्वक करण्याची नवी उमेद देतो प्रवास. भविष्याची चिंता प्रत्येकालाच असते. पण वर्तमानात काळजी करत बसण्यापेक्षा भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्याची सिद्धता करायला शिकवतो. एक जन्म आहे माणसाचा तो आनंदी होऊन जगायला हवा असाच संदेश जणू देतो हा प्रवास.  आपली एक हसरी झलक सगळे वातावरण बद्दलवण्याची ताकद ठेवते हे सांगून जातो प्रवास.

            चला तर मग प्रवासात या गोष्टी नक्की अनुभवून पहा आणि बघा तुम्ही स्वतः मध्ये किती बदल करून घेताय? 

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. अतिशय मार्मिक शब्द सहजपणे मांडणे आणि त्यातून सहज शिकवण देने ही एक कला आहे. वृषाली, खूप सुंदर लेख, मांडणी आणि विचार...
    अशीच लिहित रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ