आयुष्याची रंगीत तालीम
कसे असते ना आयुष्य
? अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे! सतत पुढे जात राहणारे. कितीही काही झाले तरी चालत
राहणारे. थकलो, हरलो , रडलो तरी आयुष्य पुढे जातच राहते. समोरच्या आव्हानांना तोंड देत जबाबदारी सांभाळत असताना भूतकाळातल्या
कडूगोड आठवणी डोक्यात साठवत आणि भविष्याची काळजी करत जगताना आपण जगणेच हरवून जातो. येणाऱ्या अडचणींमुळे वास्तवाला घाबरतो आणि भावविश्वाला आपलेसे
करतो. आयुष्याचा हा संघर्ष जन्माच्या आधीच सुरू होतो. या सगळ्या धावपळीत आयुष्याचा सुवर्णकाळ कोणता? असे कोणी मला
विचारले तर माझे उत्तर आहे “बालपण”!
‘बालपण’ एक वेगळीच निरागसता, अबोल भावनांचा अद्भुत संगम, उत्कट उत्सुकतेचे शिखर, इवल्या इवल्या डोळ्यांनी दिसणारे हे सुंदर जग इवल्याशा मुठीत
बंद करू पाहणारे स्वप्नाळू विश्व, दिलखेचक अदांचा लक्षवेधी काळ, ना भूतकाळाचा लेखाजोखा ना भविष्याची चिंता, फक्त वर्तमानात राहून प्रत्येक क्षण खास बनवणारा सुवर्णकाळ!
जादुई परीने यावे आणि जादूच्या छडीने सगळे मोहरून टाकावे असे पर्व!
आपल्या निरागस चेहऱ्यावरच्या गोड हास्याने सारा माहोल मंतरुन
टाकतो आपण बालपणात. ते निखळ हास्य मोठ्यात मोठ्या बलाढ्य आव्हानाला अगदी सोपे करून
टाकते. सकाळी उठून आपल्याला एखाद्या बालकाचे दर्शन झाले ना तर बघा आपला
दिवस किती छान जातो. एक स्मितहास्य
कितीतरी नवीन विचारांचे ठिकाण असते. कदाचित म्हणूनच, दिवसाची सुरुवात हसतमुख व्हावी असे म्हटले जात असावे नाही का!
रात्री आईच्या
किंवा आज्जीच्या कुशीत अंगाईगीते ऐकत लागलेली गाढ झोप मनाला एक आगळीच शांतता देते. स्वप्न बघत मस्त झोप होते. परत नव्याने मस्ती करायला
तयार. आपल्याच नादात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आपण या वयात. प्रत्येक गोष्ट नव्याने समजून घेण्यात आपला रस असतो. मग ते काही असो. आपल्याला एखादी गोष्ट
करायला मनाई केली तरी आपण जाऊन ते उद्योग करणारच. मग परिणाम काही असला तरी पर्वा नाही. असच जर आपण मोठेपणी वागलो तर किती छान ना! ध्येयाची वाट कितीही
खडतर असली तरी ती चालून जाण्याचा जोश, जिद्द कायम ठेवली तर
यश स्वतःहून येईल की चालत पायाशी. माती खेळताना आपण मातीशी
एकरूप होतो. आयुष्यात कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवर असावेत याची ती खूण
असावी. माती खेळत असताना ती खाल्ली पण जाते. चिखल करून त्यापासून नवनवीन वस्तू बनवत कलाकारी करत आपण नवनिर्मितीची
वाट धरतो.
कल्पना वास्तवात आणण्यासाठी आपण उतावीळ असतो. नितळ नजरेने पाहिले जाते या सृष्टीकडे. मोह, माया, कटकारस्थाने यापासून खूप लांब असते आपले विश्व. चूक झाली तरी ती अलगद निस्तरली जाते आपल्या आई-वडिलांच्या
प्रेमळ सान्निध्यात. धडपडलो तरी एक आधाराचा हात, आणि दोन आपुलकीचे शब्द मलमासारखे काम करतात. बहीण-भावंडात होणारी कुरबुर, लटका राग, आणि रुसून बसण्याचे
कसब तर डोळेच ओलावून टाकते. मैत्रीत होणारी छोटी
भांडणे किती लवकर मिटवतो आपण. वडीलधारे रागावले तरी
एका हसऱ्या अदेने त्यांना मनवतो आपण. आवडलेली गोष्ट मिळवण्यासाठी
केलेली रडारड ,हट्ट किती पटकन यशस्वी होतो ना! अभ्यास करायला बसवल्यावर लगेच
नाकावर राग पण तेच जर वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवले तर ते जमल्यानंतर आपल्याला
होणारा आनंद आकाशात नाही मावत. एखादी गोष्ट नाही जमली
तर ती परत करताना तेवढीच ऊर्जा आपण वापरतो बालपणात, त्या परिणामांचा विचार न करता आपण तयार तेवढ्याच उत्साहाने. आकाशाच्या अथांगतेचा अंदाज नसूनही आपण रात्री नभातले तारे मोजण्याचा
प्रयत्न करतो. ते एक धाडस असते बालढ्यतेचा विचार न करता आव्हानाला भिडण्याचे.
घरातील आपल्या व्यक्तींच्या सुरक्षाकवचात आपण आपले बालपण जगतो
पण ती तयारी असते समुद्रात तरण्याची. पोहून समुद्र पार करण्याची. मोठे होताना समंजसपणाच्या नादात आपण हे छोटे छोटे पण आयुष्य
सोपे करणारे कौशल्य मागे सारून पुढे जातो. वास्तवाशी झगडत मनातल्या भावविश्वाला सत्यात उतरवण्याची ताकद
आपण मोठे होत जाताना विसरून जातो. हरवून जातो आपण ते
छोटे क्षण ज्यांनी पूर्ण आयुष्याचा अर्थ न कळत्या वयात समजावला होता. निरागस निर्मल मन आणि हसऱ्या चेहऱ्यात जगातली सर्वात मोठी शक्ती
असते. कितीही मोठ्या संकटाला भिडण्याची ताकद असते. मायकेल
जॅक्सन यांच्या शब्दात सांगायचे झाले तर,
“The
magic, the wonder, the mystery and the innocence of child's heart are the seeds
of the creativity that will heal the world.”
आपण कुठेतरी हे हरवून बसतो कदाचित आणि मग घाबरतो वास्तवातील
गोष्टींना, नवीन गोष्टी आत्मसात करायला. यावर एकाच उपाय तो म्हणजे आपल्यात दडलेले लहान मूल, बालीशपणा परत नव्याने अनुभवणे. नव्याने सुरुवात करण्याची धमक ठेवणे. आयुष्याचा सुवर्णकाळ बालपणापुरता सीमित न ठेवता त्यालाही आपण
मोठे करू आपल्यासोबत नव्याने. चला तर मग आयुष्याची
‘रंगीत तालीम’ असलेले बालपण करून पाहू सादर जीवनाच्या रंगमंचावर!
Very nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteMast👌
ReplyDeleteखूपच सुंदर. Keep writing.
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteNice ☺️ Keep writing 👍
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDelete👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete