भान वास्तवाचे

          मृत्यू…… एक शाश्वत सत्य! या इहलोकात जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ. कदाचित म्हणूनच इहलोकाला मृत्यूलोक असेही म्हणतात. मृत्यू म्हणजे या मृत्यूलोकातल्या आपल्या अस्तित्वाचा अंत. एक दिवस या मृत्यूला सामोरे जायचे आहे हे माहित असते, तरीही याबद्दलचा विचारही मनाचा थरकाप उडवतो नाही का? कदाचित या कटू सत्याला स्वीकारण्याची मानसिकताच नसते. गीतेतल्या श्लोकाप्रमाणे,

                                  “ जातस्य हि ध्रुवो मृत्यूध्ररवं जन्म मृतस्य च। ।                               

                                     तस्मादपरिहार्ये र्थे न त्वं शोचितुमर्हसी।।”

                 म्हणजेच अटळ आणि अपरिहार्य गोष्टीचा शोक नको. भय मृत्यूचे नसावे. भय असावे मनाचे , मनातल्या भावनिक कल्लोळाचे, या इहलोकातल्या मोहमयी त्यागाचे, नाही का?

                स्वतःच्या मृत्यूपेक्षा जास्त भय आपल्या जिवलगांच्या मृत्यूचे वाटत असावे ना! आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाईल ही भावनाही नकोशी असते. या महाभयंकर कोरोनाने कित्येकांचा मृत्यू ओढवला. कित्येकांनी आपल्या जिवलग व्यक्तींना गमावले. दुःख ते गेल्याच नाहीये, दुःख आहे परिस्थितीपुढे झुकल्याचे, हतबल झाल्याचे. काही गोष्टी हातात असूनही हातातून निसटल्याचे. कदाचित हरल्याचे दुःख. सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना खऱ्या सुखाला, प्रेमाला मुकल्याचे दुःख. निसर्गापुढे हरल्याचे दुःखमरणाच्या दारातून परत आणायला तयार आणि तत्पर असणारे वैद्य आज हतबल आहेत. त्यांना दुःख आहे की सर्व हाताशी असूनही आपण काहीच करू शकत नाही. शपथ घेतलेली असते रुग्णसेवेची पण ऑक्सिजन नाही किंवा बेड नाही म्हणून आज नाही म्हणावे लागतेय त्यांना. आणि दुर्दैवाची गोष्ट त्या व्यक्तीचा बेडअभावी, ऑक्सिजन अभावी मृत्यू व्हावा. यावरून दुःखद काय असावे.

                   पोलीस, वैद्य, आरोग्य कर्मचारी, स्वतःच आयुष्य पणाला लावून काम करणारा प्रत्येक कर्मचारी कोरोनाला थोपावण्याचा जीवतोड प्रयत्न करताय. कित्येकांनी जीव गमावला. तरीही परिस्थितीच गांभीर्य समाजातल्या घटकांना नाहीये ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. काहींच्या मते कोरोना नाहीये मग नियम का पाळायचे? कोरोना काय आहे हे त्यांना जाऊन विचारा ज्यांचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले . त्यांना विचारा ज्यांनी घरातला कर्ता माणूस गमावला. एक औषधापायी आणि बेडपायी आपल्या जवळच्याना जाताना पाहिले त्यांना विचारा कोरोना काय आहे?  ज्या एका सिलिंडरमुळे आणि एक औषधाने कोणाच्या तरी जीवनमरणाचा प्रश्न आहे त्याचा काळाबाजार जर होत असेल तर काय म्हणावे याला? मरण कोणाला चुकत नाही पण अशा परिस्थितीत मरण आल्यावर काय मानसिकता असेल त्या व्यक्तीची? त्याच्या घरच्यांची?

                   जगण्याचा संघर्ष मान्य आहे. पण मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी संघर्ष करावा लागणे पटत नाहीये मनाला. काय अर्थ उरतो आयुष्याला जर परतीचा प्रवासही त्रासदायक असेल? ना चितेला लाकडे मिळतायत ना स्वजनांच्या हातचे पाणी. म्हणजे आयुष्यभर जगण्यासाठीच्या संघर्षाची गोळाबेरीज शून्य.

               विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर आकाशाला गवसणी घातली मानवाने पण मृत्यूवर विजय मिळवणे नाही जमले. मरण कोणाला चुकत नाही पण यावेळेस आपण आपल्याच चुकीची शिक्षा भोगतोय. आपण कुठे चुकलो माहितीये? आपण आपले अस्तित्व ज्याच्यामुळे आहे त्या निसर्गचक्रात प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप केला. निसर्गाला हस्तक्षेप मान्यही असावा, पण आडवा आला तो स्वार्थीपणा आपण निसर्गाकडून घेतच राहिलो. परतफेड करायची विसरलो. आपली  खरी लढाई कोरोनाशी नाहीये. आपली लढाई आहे स्वतःशी, कर्माशी, नैतिक मूल्यांशी, संस्कारांशी, समाजाच्या मानसिकतेशी. कोरोनाने पहिल्या लाटेत चेतावणी दिली होती पण ती आपण ऐकू तर ना! आज सर्वात जास्त वाईट याच गोष्टीच वाटतेय. आज सगळे हतबल आहेत परिस्थितीपुढे. पैशाच्या जोरावर सगळे विकत घेता येतंय आज अक्षरशः प्राणवायुसुद्धा पण आज तो मिळवायला नशिबाची साथ लागतेय. औषधें आहेत पण ती मिळवण्यासाठी समोर आहे मोठे आव्हान. काय कमावले आपण ? कमावण्याच्या नादात जे जपायचे होते ते विसरलो आणि आता ते गमावण्याच्या उंबरठ्यावर आहोत. काय अर्थ उरला त्या कमवण्याला?

                  अजूनही वेळ गेलेली नाहीये खूप काही आहे हातात. गरज आहे सुरुवात करण्याची, स्वार्थ बाजूला ठेवून प्रामाणिक कर्तव्य निभावण्याची, निसर्गाला जपण्याची. परिणाम काही असो एक पाऊल टाकायला काय हरकत आहे!  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ