खंत

 

           अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र, पर्वतराजीत उगम पावून सागर मिलनाच्या प्रवासात प्रत्येकाचे जीवन समृद्ध करत निघालेल्या नद्या, अभेद्य असे पर्वत, तप्त धरणीला शांत करणारा पाऊस, सुर्यकिरणांमुळे तयार झालेले इंद्रधनुष्य, कानावर येणारा असंख्य पशु-पक्ष्यांचा आवाज, थंडीच्या दिवसात पसरलेली धुक्याची चादर, नेत्रतृप्त करणारे हे अविस्मरणीय दृश्ये असतात. हा अद्भुत नजराणा आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेला आहे. ज्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे असा निसर्ग, ज्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे तो निसर्ग, या इहलोकात स्वर्गसुखाची अनुभूती देणारा निसर्ग, प्रत्येक घटकाच्या उत्पत्तीच कारणीभूत ठरणारी एक साधन,  या विश्वातल्या प्रत्येक घटनेच मूळ.   निसर्ग..…  एक अशी संकल्पना जी जितकी समजून घ्यावी तितकी उलगडत जाणारी.

                  प्राचीन संस्कृतीने आपल्याला निसर्गनियम शिकवले. निसर्गाला अनुभवायला शिकवले. निसर्गाचा आदर करायला शिकवले. एक अद्भुत असा खजिना जपायचा वारसा दिला. आपले सण-उत्सव, परंपरा या सगळ्या निसर्गधारीत आहेत. प्रत्येक सण एक नवीन वैशिष्ट्य उलगडत निसर्गच महत्व पटवून देत असतो. याच निसर्गाला उलगडत मानवाने शोध लावले. विज्ञान ही संकल्पना प्रकाशात आणली. याआज आपल्या दैनंदिन जीवनातील सुखसोयीच मूळ निसर्ग आहे. स्वतःकडे असलेले सगळे काही दान करण्याची प्रवृत्ती असलेला हा निसर्ग आपला सगळ्यात मोठा मार्गदर्शक आहे. संपूर्ण विश्वाला नियमानुसार जगायला शिकवणारा सर्वश्रेष्ठ गुरू आहे. या जगात जन्म घेऊन आयुष्य जगण्याचे सगळ्यात मोठे वरदान देणारी ही निसर्गदेवता.

                पण आज या देवतेच्या संवर्धनासाठी जागतिक स्तरावर ‘निसर्ग संवर्धन दिन’ साजरा करणयाची वेळ यावी ही संपूर्ण मानवजातीसाठी लाजिरवाणी बाब नाही का? असे का व्हावे? ही वेळ का यावी? असे असंख्य प्रश्न भेडसावतात ना? पण सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत. आपले कसे झाले माहिते का,

                            देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे

                               घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ।।“

               आपण फक्त घेत आलोय. निसर्गाला काय देणार तोच तर आपल्याला सगळे काही पुरवतोय, असेही वाटत असेल ना! हेही ठीक आहे. निसर्गाला कदाचित ते मान्यही असावे. पण त्याचा वापर करताना मानवाने केलेला स्वार्थीपणा त्याला मान्य असेल का? आपल्या कामात आपल्याला नको ती लुडबुड चालत नाही मग निसर्गाने का चालवून घ्यावी त्याच्या नियमावलीत ढवळाढवळ?  मानवाने आज तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळात प्रवेश केला, पण हे साध्य ज्याच्यामुळे शक्य झाले ज्याने स्वतःच्या कक्षा मानवाला ओलांडून दिल्या त्या निसर्गाचे आपण कधी आभार तरी मानलेत का? इमारती उभारण्यासाठी कित्येक झाडे तोडली जातात, कित्येक पशू- पक्षी निवाराहीन होतात. आपण कधी ती झाडे परत लावण्यासाठी, पशु- पक्ष्यांना त्यांचा निवारा मिळवून द्यायचा प्रयत्न केलाय का?

                 आज कोरोनामुळे संपूर्ण जगावर मोठे संकट ओढवले. हातातील सगळे काही सोडून आपल्याला चार भिंतीच्या आत राहावे लागले. जो प्राणवायू आपल्याला निसर्गाने सहज उपलब्ध करून दिला, तो मिळवण्यासाठी झगडावे लागले. सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे जनजीवन उध्वस्त झाले. एवढेच नाहीतर, अक्षरशः नदितल्या मगरी, साप मानव वस्तीत ठाण मांडून बसले आहेत. ही शिक्षा तर नसेल ना निसर्गाने आपल्याला दिलेली? आपण पशु-पक्ष्यांच्या निवाऱ्यावर केलेल्या आक्रमणाची तर परतफेड नाही ना? कदाचित असेच असावे कारण कोरोना मुळे आपल्याला संचारबंदी होती पशु-पक्ष्यांना नाही. नैसर्गिक आपत्ती हे निसर्गचक्राचा भाग आहे, पण त्याची वारंवारिता वाढणे हे धोक्याचे संकेत आहेत.  ठराविक कालांतराने घडणारे बदल त्या कालावधीच्या आधीच घडणे हे विचार करायला लावणारे आहे.

              आजच्या ‘जागतिक संवर्धन दिना’च्या निमित्ताने या सगळ्याचा विचार करायला हवा. जेणेकरून भविष्यातील अशा घटनांना आवर घालणे, आणि पूरक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.  कारण ज्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्याच्या संवर्धनाची वेळ येणे, याहून मोठी खंत नाही. म्हणूनच तर आपण आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी एक छोटे पाऊल उचलायलाच हवे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ