महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर- कळसूबाई

 

          कळसुबाई……पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या अतूट, अभेद्य अशा सह्याद्री पर्वताची शान. अर्थातच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट. पर्वतराजीत उगम पावणारे धबधबे  आणि तो स्वर्गाची अनुभूती देणारा निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजराणा.. पराकोटीचे नयनसुख. अशा ठिकाणी पावसाळ्यात भेट देणे म्हणजे पर्वणीच नव्हे का?

                      समुद्रसपाटीपासून 1,646 मीटर उंचीवर असलेले हे शिखर अहमदनगरमधील अकोला आणि नाशिकमधील इगतपुरी यांच्या सीमेवर वसलेले आहे. या भागात  प्रामुख्याने बेसॉल्ट खडक आणि जांभी मृदा आढळून येते.

                       पायथ्याशी असणाऱ्या बारी गावातून शिखराकडे वाटचाल करावी लागते. या गावच्या ग्रामपंचायतीने वाहनांसाठी पार्किंगची सोय केलेली आहे. गावातून थोडेसे चालत गेल्यानंतर शेत लागतात. शेतांच्या बांधावरून चालत गेल्यानंतर छोटासा बंधारा आहे. अजून थोडे चालून गेल्यावर चढण आहे. तिथे पायऱ्या बनवलेल्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर दाट झाडांमधून जावे लागते. इथे बऱ्याच ठिकाणी पायऱ्यांची शेती केलेली आहे. प्रामुख्याने भाताचे पीक या शेतीत घेतले जाते.  झाडांच्या मधून चालत जाताना वेगवेगळे कीटक, पक्षी यांच्या आवाजाने मन सुखावून जाते. पुढे छोटेसे पठार आहे. इथेही कळसुबाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. जे लोक पूर्ण डोंगर चढून जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. ‘कळसुआईचे माची मंदिर' या नावाने ते ओळखळे जाते. एक टेकडी पार होत आल्यावर समोर सह्याद्रीचे विलोभनीय दर्शन घडते. पाऊस पडलेला असल्यास धबधब्यांचे दर्शन घडते. त्यानंतर थोडे चालून गेल्यावर पहिली टेकडी पार होते.

                         दुसऱ्या टेकडीवर चढाईसाठी दोन शिड्यांची व्यवस्था केलेली आहे. यातील पहिली शिडी छोटी आहे त्यामुळे चढताना मस्त वाटत होते पण परीक्षा पुढे होती. धैर्याची परीक्षा. दुसरी शिडी चढताना शारीरिक बलाबरोबरच मनोबलही लागते. ही शिडी चढल्यानंतर काहीतरी फत्ते केल्यासारखे वाटत होते.  पण तोवर पोटात कावळे ओरडायला लागले होते. थोडे चालून गेल्यावर तिथे नाश्त्याची सोय आहे. तिथे भजी आणि घरून आणलेला खाऊ आम्ही फस्त केला. तिथे एक छोटी विहीर आहे. पूर्ण चढाईत या एका ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. तिथे दुसरा डोंगर संपतो. पुढे जात असताना तग धरण्याची क्षमता कमी होत चालली असतानाच तिसरी शिडी लागते आणि मनाला थोडेसे हायसे वाटते. ती शिडी पार केल्यावर शेवटी आपण आपले ध्येय गाठतो. एखादा गड जिंकल्याची भावना येते मनात. शिखरमाथ्याला काळसुआईचे छोटेखानी मंदिर आहे. एवढी फत्तेशीकस्त झाल्यावर देवीचे दर्शन शरीराचा ताण हलका करून टाकते.

                       या ठिकाणाला भेट द्यावी तर माझ्या मते ती पावसाळ्यातच. कारण निसर्ग पुरेपूर अनुभवायला भेटतो. पाण्याचा वाहतानाचा तो खळखळ करणारा आवाज आपल्या चढाईला पार्श्वसंगीत देतो. प्रत्येक उंचीवर आढळणारी वेगवेगळी फुले-पाने जैवविविधतेचे दर्शन घडवतात.  चहूबाजूंनी पसरलेला अक्राळविक्राळ सह्याद्री अथांगता आणि अभेद्यतेचे दर्शन घडवतो. ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक आणि लेखक ग्रेग चाईल्ड याच्या शब्दात सांगायचे झाले तर,

      “Sometimes between  the bottom of the climb and the summit is the answer to the mystery why we climb.”

                      म्हणजेच आपण ही चढाई का चढतोय? या रहस्याचे उत्तर पायथ्यापासून ते शिखरापर्यंतच्या प्रवासात असते. प्रत्येक गिर्यारोहक कदाचित असेच रहस्य शोधण्याचा प्रयत्न करीत असावा. मनात येणाऱ्या सकारात्मक नकारात्मक भावनांचा विचार न करता आजूनजुच्या परिसराला अनुभवत आपले इप्सित गाठणे हे एकच ध्येय ठेवून वाटचाल सुरू ठेवणे हे मोठे अवघड काम असते. आपण सुखरूप पोहचू ना? आपण शिखर गाठू ना? आपण घरी सुस्थितीत पोहचू ना? असे नाना प्रकारचे प्रश्न मनाला भेडसावत असतात. पण तरीही ऊन-वारा-पाऊस अशा अनेक नैसर्गिक घटकांना तोंड देत उभे असलेली ती झाडे एक वेगळ्या प्रकारचा धीर देऊन जातात. एखादी गोष्ट साध्य करताना काही नियम पाळावेच लागतात ही अनमोल गोष्ट आपल्याला असे गिर्यारोहण शिकवते. अशा ठिकाणी राहणारी माणसे, त्यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवते. मधेच आपल्या पिशवीतील खाऊ पळवणारी माकडे पोटासाठी चाललेल्या संघर्ष दर्शवतात. निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्याला बघायला मिळते. आपण स्वतःला कितीही मोठे समजत असलो तरी एवढ्या मोठ्या शिखरावर आपण मुंगीएव्हढेच दिसतो. ही आहे निसर्गाची अफाटता.

                     एवढे मोठे ज्ञान आपल्याला ज्या ठिकाणाहून मिळते, आपण त्याचे उपकार नाही फेडू शकत. पण त्या परिसराला तिथल्या घटकांना हानी पोहचविण्याचा आपल्याला काडीमात्र अधिकार नसतो. तरीही काही लोक तिथे माकडे त्रास देतात म्हणून प्लास्टिक पिशव्या, इतर कचरा त्यांच्याकडे फेकतात. जर तुम्हाला त्यांना अन्न द्यायचे नसेल तर त्यांना अशा वस्तू देऊन त्यांना मूर्ख बनवून त्यांना हानी पोहचविण्याचा अधिकार नाही. माणसांनी कितीही सुशिक्षितपणाचा आव आणला ना तरी निसर्गाला  माणसाला त्याची जागा दाखवून द्यायला वेळ लागत नाही. आणि आपण ते अनुभवतोय सध्याच्या घडीला.

                       या सुंदर सृष्टीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिचे जतनही तितकेच महत्वाचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे. अशा या सर्वोच्च ठिकाणाला जरूर भेट द्या. पण त्या ठिकाणाला हानी न पोचवता. मग हा सह्याद्री त्याचा प्रत्येक कडा प्रत्येक शिखर सर करायला त्याचे अजाणबाहू पसरून तुमचे स्वागत करेल.



कळसुआईचे माची मंदिर




शिखर

Comments

  1. खूप छान भासवलीस एकूण सफर 😍😍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ