अनुभवावे असे काही.....

 

               




        सूर्योदय…. एक विलक्षण अनुभव. रात्रीच्या किर्रर्र अंधारानंतर प्रकाशाचा आश्वासन देणारी एक नैसर्गिक घटना. सूर्यास्त झाला म्हणजे सगळे संपत नाही, तर डोक्यात आलेल्या विचारांच्या वादळाला शमवण्यासाठी असलेल्या रात्रीनंतर नव्या उमेदीने जगायला शिकवणारे निसर्गाचे एक अद्भुत रूप म्हणजे सूर्योदय.

           खरंच निसर्ग एक गूढ आहे, समजून घेत जावे तसे उलगडत जाते, पण त्याला थांग नाही. निसर्ग  प्रत्येक गोष्ट किती चपखलपणे स्वतःमध्ये सामावून घेतो. निसर्ग जगायला शिकवतो. जन्मही त्याच्याच कुशीत आणि जगण्याची उमेद देणाराही तोच. मृत्यूनंतर विलीन करून घेणाराही तोच.

           सूर्योदयही त्याचीच एक देणगी. भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर सूर्यमालेतील ग्रहांच्या  परिवलन आणि परिभ्रमण यांच्यामूळे घडून येणारी एक घटना, पण भावनिकदृष्ट्या उमजावे तेवढे कमीच. आता आपलेच घ्या, दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विसाव्याची गरज असते, तसेच डोक्यालाही शांतता हवी असते. दिवसभराच्या गोष्टींचा आढावा घेत होणारी रात्र अनेक विचारांना जन्म देते. तो दिवस तर संपतो पण डोक्यातले  विचार नाही.  भूतकाळ आठवत आणि भविष्याचा विचार करत झोप लागते. रात्रीच्या झोपेनंतर आपल्या आयुष्यात येणारी सकाळ प्रत्येकासाठी एक नवीन संधी असते. अतिविचाराने निराश झालेल्या मनाला सुर्यकिरणाची एक तिरीप नव्या उमेदीचा श्वास देते. शांत झालेल्या डोक्याला नवीन विचारांची भेट देते.

           सूर्योदय बहुतेक सगळेच बघतात, पण त्याला कधी अनुभवलंय का ? काळ्याकुट्ट अंधारात हळूहळू प्रवेश करून जगाला प्रकाशमान करणारा सूर्य मनाला सुखावत असतो. सुर्योदयावेळी बदलणाऱ्या असंख्य रंगछटा तर निराळ्याच असतात. एक एक रंग डोळ्यात साठवता साठवता कित्येक वेळा सूर्य कधी वर येतो कळतच नाही. क्षणोक्षणी बदलणारे ते दृश्य खूप विलोभनीय असते. आपल्या एकेका किरणाने वर येत भोवतालची सृष्टी उजळवणाऱ्या सूर्याला आपोआप आपण नमस्कार करतो. सूर्याच्या कोवळ्या किरणांचा स्पर्श होताच प्रफुल्लीत होणारी सृष्टी मन उत्साहित करून टाकते. झाडे-झुडपे , त्यावरील दवबिंदू जणू या अद्भुत प्रसंगाचे साक्षी असतात. पशु-पक्षीही जागे होत जागे होत  आपल्या आपल्या आवाजाने जणू सूर्याचं  स्वागतच करत असतात. सूर्यकिरणांनी  हळूहळू उजळत जाणारा सभोवताल प्रत्येक दिवशीच्या नाविन्याची ओळख करून देत असतो. हे मोहक दृश्य अनुभवत मन भारावून जाते, हरवून जाते. मग सूर्याचं स्वतःची किरणे प्रखर करत आपल्याला नवीन संधी आजमावून बघायला प्रवृत्त करतो.

   “It was sunsets that taught me that beauty sometimes only lasts for a couple of moments, and it was sunrise that allowed me that all it takes is patience to experience it all over again”

A.J. Lawless

       चला तर मग सूर्योदयाला नव्याने अनुभवायला शिकूया, बघूया किती रहस्य उलगडता येतील!


        ©वृषाली आघाव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ