उत्सव बाप्पाचा…..
"जल मे थल मे सृष्टी सकल मे
वन मे रण मे कणकण मे |
तरू मे त्रण मे गज मे गण मे
मोरया है हर मन मे |"
चराचरात सामावलेल्या आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटात झाले असेल
ना! मूर्तीकारांच्या अपार भक्ती आणि मेहनतीने आकारास आलेले बाप्पा यावर्षीही थाटात
विराजमान झाले. गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी मनाचा मानबिंदू आहे. बाप्पा म्हणजे प्रत्येकाच्या
मनाचे चिरतारुण्य , बाप्पा म्हणजे उत्साह, बाप्पा म्हणजे आशेचा किरण!
Bappa is an emotion.
अशा बाप्पाला घरी नेण्यासाठी चाललेली लगबग बघण्यासारखी असते.कितीतरी काळ अगोदरपासूनच तयारी चालू झालेली असते. घरगुती गणपतीची सजावट, मखर, आसन, मुकुट, प्रसाद अणि मंडळाच्या गणपतीच बघायचं झाले तर वर्गणी काय…सजावट काय, ढोलताशा पथक काय….अन अजुन कितीतरी गोष्टी खूप आधीपासून
ही लगबग चालू असते नाही का?
लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सजून-धजून आलेले अगदी नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत भक्तगण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात
बाप्पाला मिरवत नेतात. छोट्या मुलांचा उत्साह तर शिगेला पोहोचलेला असतो. ते इवलेसे
हात बाप्पा झेपत नाही तरी त्याला हातात घेण्यासाठी आसुसलेले असतात. घरी बाप्पाचे आगमन
झाल्यावर त्याची विधिवत प्रतिष्ठापना करून आरती होताच प्रसादासाठी उडालेली झुंबड अणि
बाप्पाला गरम, आखीव-रेखीव, चविष्ट अशा मोदकांचा प्रसाद बनवण्यासाठी घरच्यांची उडालेली तारांबळ शब्दांत सांगता
येणार नाही. आरतीनंतर तो पसरलेला धूप-उदबत्तीचा सुवास घर आणि मनही सुगंधित करून टाकतो. बाप्पाच्या या काळात वातावरण अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. याहून विलोभनीय दृश्य या इहलोकी बघायला मिळणे कदाचित अशक्यच!
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या
काळात एकात्मतेसाठी सुरू केलेला हा गणेशोत्सव आजही परंपरागत पार पडतो. पण खेदजनक बाब अशी की आज ही एकता दिसून येत नाही. माझे मंडळ मोठे, माझा गणपती मोठा अशी चाललेली स्पर्धा, एकमेकांना खिजवण्यासाठी मंडळांनी केलेले
नको ते उद्योग, कान फाटेल असा वाजणारा तो डीजे, मोठेपणा दाखवण्यासाठी केलेला अवाजवी
असा अवास्तव खर्च कशासाठी? बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी जो स्वतः सर्वसंपन्न आहे त्याला हा दिखावा! त्याच्या मंडळाच्या नावाखाली
चाललेले राजकारण, भांडणे त्याला बघवेल का?
एकता तर सोडा हो.... माणुसकीही हरवत चाललीये त्याचे काय? बाप्पाचे दर्शन सर्वाना हवे असते पण त्यासाठी
या उत्सवात पैसे मोजायला लागावेत याहून मोठे दुःख नाही. दहा दिवस आपल्यासाठीच आपल्यात आलेल्या बाप्पाला हे आवडेल का? जीव गुदमरेल ओ बाप्पाचा. काही लोक असेही असतात जे बडेजावपणाचा आव आणता. अहो कशासाठी! ज्याच्यामुळे सगळे आहे त्याच्यासमोर
उगीच शक्तिप्रदर्शन कशाला? खूप जण याला सहमती दर्शवतात, खेद व्यक्त करतात, विशेषतः तरुण वर्गाला टार्गेट करून आपले मत व्यक्त करता, पण काय हो पण या गणेशोत्सवाच्या काळात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत का? सगळे
राहुद्या रहदारी नियंत्रणासाठी आलेल्या पोलीस, स्वयंसेवकांच तुम्ही ऐकता तरी का? उत्सव
उत्सवच व्हायला हवा हो नुसतेच प्रदर्शन नाही.
चौसष्ठ कलांचा अधिष्ठाता असलेल्या गणरायाला मनोभावे प्रणामही पुरेसा आहे. आणि त्या बुद्धिदेवतेसमोर असे लागल्यावर त्याला पटेल का! याचा नक्कीच विचार करायला हवा. दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा श्रीगणेशा स्वतःपासून करायला हवा. प्रत्येकाने जबाबदारीने, माणुसकीने वागले तर बाप्पाही आनंदित होईल. श्रद्धा असावी पण दिखाऊ असू नये. जर आपण बाप्पाची सेवा निर्मळ मनाने आणि एकात्मतेने केली तर बाप्पा 10 दिवसच काय सतत आपल्यासोबत राहील. चला तर मग एका नवीन संकल्पाने गणेशोत्सव साजरा करूयात.
गणपती बाप्पा मोरया!
©वृषाली आघाव
Nice
ReplyDelete😍😍👌👌
ReplyDelete😍🔥❤️
ReplyDeleteMast ✨🙏
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteउत्तम 🙌🙌🙏
ReplyDeleteVery True..👍Ganpati Bappa Morya 🌺
ReplyDelete