कानमंत्र

   कागदाची “नाव” होती….

              पाण्याचा “किनारा” होता..

मित्रांचा “सहारा” होता

           खेळण्याची मस्ती होती

मन हे “वेडे” होते

                          “कल्पनेच्या” दुनियेत जगत होते..

                                 कुठे आलो या “समजूतदारीच्या” जगात

                                          यापेक्षा भोळे ते “बालपणच” सुंदर होते….

 

           कोण्या अज्ञात कवीचे शब्द आज मन:पटलावर सहजच कोरले गेले आणि मन हळवे झाले. किती सुंदर होता ना तो काळ ! प्रत्येक क्षण असा अगदी काल घडल्यासारखा डोळ्यासमोरून जात आहे. अर्थातच आयुष्याची रंगीत तालीमच आहे की तो सुवर्णकाळ.

        प्रत्येकाच बालपण जरी वेगळे असले तरी ते बालमन काही अंशी समानच असते. बालमनाच्या निरागसतेत एक मायेचा ओलावा होता. झाल्या गोष्टी तिथल्या तिथे सोडवल्या जात. एक लटका  रुसवा तर आईच्या प्रेमळ बोलावण्याने निघून जायचा. मोठ्या माणसांशी डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात तेव्हा एक पुरस्कार वाटायचा. खिशात खोटे पैसे असतानाही लखपती असल्यासारखे वाटायचे. कारण आहे त्या गोष्टीत फक्त आनंद लुटायचा एवढेच तर माहित होते त्या बालमनाला. घरच्यांच्या मागे लागून त्यांच्यामागे जाण्याचा हट्ट करणे त्यांनी नाही म्हटल्यावर आपला रुसवा एक छोट्याशा चॉकलेटने निघून जायचा आणि आता वाईट वाटते. का ? कारण आपण आपल्यातले बालमन कुठेतरी दडवलेय.

           शिशु-अवस्थेतून नुकतेच बाहेर पडलेल्या त्या इवल्याशा जीवाला पडणारे ते अगणित प्रश्न आणि त्या प्रश्नाने भंडावून गेलेले आपले प्रियजन, उत्तर ऐकण्यासाठी उत्कंठीत असेलेले ते इवलेसे मन. शास्त्राशी काही एक संबंध नसताना स्वतःच एक शास्त्र बनवत जगणारे ते सुंदर दिवस होते. त्या बोलक्या डोळ्यांमध्ये आभाळ रिते करण्याची स्वप्ने होती.  स्वप्नांच्या दिशेने जाण्यासाठी लागेल ते करण्याची तयारी होती. स्वतःच्या डोळ्यात मोठेपणाचे स्वप्न ठेवून घरच्यांसमोर दाखवलेला तो निखळ निरागस अभिनय, तो समजूतदारपणा. प्रियजनांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्यांचा चेहरा हसरा करण्याचा जादुई मंत्र हातात होता. प्रत्येक नवीन गोष्ट करण्याचा अट्टहास, एक जिद्द होती मग ना झोप यायची ना कंटाळा. आजोबांच्या पराक्रमाचे किस्से, आजीच्या छान गोष्टी, एवढे करूनही झोपलो नाहीतर पडणारे रट्टे  आणि मग ती तक्रार सोडवणारे बाबा. सुट्टीत मामाच्या गावी केलेली ती मज्जा, मामाकडून हवे तेवढे पुरवून घेतलेले लाड, प्रेमाने सतत काही न काही तोंडात भरवणारी आजी, रात्री आकाशात ताऱ्यांची ओळख करून देणारे आजोबा. आज हे सगळे आपल्यासोबतच असूनही ते दिवस हरवल्यासारखे झालेत. ते अविस्मरणीय क्षण आजही एका दिवास्वप्नासारखे डोळ्यांसमोर येतात. आणि एक हलकेच हसू चेहऱ्यावर पसरून डोळ्यात अश्रू तरळतात.

           आजही ते बालमन आपल्याकडे आहे पण आता मोठे झाल्याने त्या बालमनाला दडवतो तो अतिसमजूतदारपणा. बालपणी पाहिलेल्या स्वप्नांचाच पाठलाग आपण करतोय परंतू त्या नादात त्या प्रवासाची मजा घ्यायला विसरतोय  म्हणूनच बालपणीचे दिवस जरी हरवले असले तरी बालमन जोपासायला विसरतोय. का ? तर आता मोठे झालो ना ! जबाबदारी आली, पुढ्यात भविष्य आहे, पण या धावपळीत स्वतःच कुठेतरी हरवतोय. भूतकाळाचा ताण आणि भविष्याची चिंता करत वर्तमानात जगायचेच राहून जातेय. आपण ते दिवस तर परत नाही जगू शकणार पण आपल्यातल्या त्या बालमनाला नक्कीच जपू शकतो. जेणेकरून वर्तमानात जगण्याचा एक कानमंत्र आपल्या हातात असेल.

           आजच्या या बालदिनाच्या निमित्ताने हा कानमंत्र अंमलात आणायचा संकल्प आपण नक्कीच करू शकतो 




Comments

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ