ऋतुराजाची मुहूर्तमेढ
" रसरंगांची करीत उधळण
मधूगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफीत माला रसिकराज
पातला
आला वसंतऋतु आला
वसुंधरेला हसवायला, सजवीत, नटवीत लावण्याला
आला वसंत ऋतू आला "
गीतकार शांताराम आठवले
यांनी शब्दबद्ध केलेले, प्रभाकर जोग यांच्या संगीतासह
आशा भोसले यांनी सुरबद्ध केलेले ‘आला वसंत ऋतू आला’ या गाण्याचे वरील बोल कानावर पडले
अन मन मंत्रमुग्ध झाले. चैत्रारंभाची किंचितशी चाहूल
मन मोहरून टाकते. फाल्गुन महिन्यात होळी आणि
रंगपंचमी होऊन गेली असल्याने अगोदरच आपली मने उल्हासित झालेली असतात. चैत्रापासून ऊनही तेजाळून निघते. चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही, तर त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते. झाडांना पल्लवित करणारी आणि आणि फळांना गोडवा आणणारी. चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद
उतरते आणि मग आपणाकडे येते. अशा या वसंताची मुहूर्तमेढ
म्हणजे गुढीपाडवा. यालाच विजय पाडवा असेही म्हणतात.
ग्रेगरियन दिनदर्शिकेप्रमाणेच
भारतात संवत्सर दिनदर्शिकेलाही मोठे महत्त्व आहे. संवत्सर हा बारा महिन्यांचा
म्हणजेच एक वर्षाचा कालावधी असतो. चांद्रवर्षानुसार हा काळ सुमारे
३५४ दिवसांचा असतो. या शक संवत्सराची सुरुवात
म्हणजेच गुढीपाडवा. भारतीय परंपरांमध्ये संस्कृती
आणि निसर्गाची सर्वोत्तम सांगड घातल्याचे पाहायला मिळते. ऋतुचक्राप्रमाणे बदलत जाणारे जीवनचक्र, परंपरा, चालीरीती, सण-उत्सव, आहार मानवी जीवनाला अत्यंत पूरक असल्याचे पाहायला
मिळते.
आधुनिकतेकडे मार्गक्रमण
करताना आपल्याला संस्कृतीचा ठेवा जपायलाच हवा. सण-उत्सव, परंपरा यांचे एक उद्दिष्ट
असते. ते उद्दिष्ट साध्य झाले तरच खऱ्या अर्थाने सण साजरा
झाला असे समजावे. नवीन पिढीला परंपरागत वारसा
उद्दिष्टांसकट पोचवायला हवा. आजच्या धावपळीच्या जगात सणांमधला
गोडवा कुठेतरी हरवत चाललाय. कारण हेच की सणांमागचा अर्थच
त्यांना उमगत नाहीये. कोणी अर्थ सांगितला तर त्यांना
सनातनी समजले जाते. परंपरा जपणारे सनातनी नसतात. ते काळानुसार बदलणारे पुरोगामीच असतात. फक्त संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपल्या पदराला बांधून
मार्गक्रमण करत असतात.
भारतीय संस्कृती एक
परिपूर्ण संस्कृती आहे. आपण नाही जपणार मग कोण? आता
गुढीपाडव्याचेच बघा की, आजचा मुख्य प्रसाद म्हणजे
कडुनिंबाचा पाला आणि गूळ. यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे
कडुनिंबाचा शीतलतेचा गुणधर्म आणि गुळाचा गोडवा. रखरखीत ग्रीष्माला
तोंड देण्यासाठी सज्ज होण्यास मदत करणारी जणू संजीवनीच. असेच प्रत्येक सण आपले महत्व आपल्या वेगळेपणाने
जीवनचक्राचा अर्थ समजावत असते. ऋतुचक्रानुसार बदलणारी सणांची
विविधता संस्कृतीसौंदर्यात भर घालते. या परंपरांची प्रत्येक
वर्षी नवी सुरुवात अर्थातच नवसंवत्सराची सुरुवात वसंताच्या चाहुलीने होते.
या विश्वातील प्रत्येक
गोष्ट नश्वर आहे असे समजावत निरोप घेणारा शिशिर आणि त्यानंतर सृजनाची
पालवी बनून येणारा वसंत आपल्या जीवनचक्राचा एक भाग आहे. जिथे नवीन सुरुवात असते. नवचैतन्याची शिरशिरी आणणारा हा वसंत खऱ्या अर्थाने
ऋतुराज आहे. जीवन फुलवण्याचे सामर्थ्य या वसंतात आहे. असा हा वसंत कालिदासाच्या ऋतुसंहारात मदनयोध्दा
आहे, आयुष्याच्या प्रत्येक पावलावर जीवन समजावणारा गुरू
आहे. अशा या नवचैतन्याची गुढी उभारून आपण मुहूर्तमेढ
रोवूयात.
" वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः ।
तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि ।।"
© वृषाली आघाव

🙌❤️
ReplyDelete