राहिल्या फक्त आठवणी……..

 

 

" शायद फिर वह तकदिर मिल जाए

 जीवन के हसीन पल मिल जाए

चल फिर बैठे क्लास की उस लास्ट बेंच पे..

शायद वह पुराने दोस्त मिल जाए

वह साथ बिताए हुए पल दांस्ता मे बदल रहे 

आ गया वह मोड जिसमे अलविदा कहना पड रहा "

              कोण्या अज्ञात लेखणीतून अवतरलेल्या या काही ओळी सहज समोर आल्या आणि चार वर्षांचा प्रवास डोळ्यांसमोर अगदी चित्रपटाप्रमाणे येऊन गेला. चार वर्षांपूर्वी ज्या परिसरात मनात भीती असताना दबक्या पावलांनी प्रवेश केला, तो परिसर सोडण्याची वेळ कधी आली ते समजलेच नाही.

                   आज जेव्हा ते सुरुवातीचे दिवस आठवले ना तरी अलगद हसू फुटते. कावरे बावरे झालेले मन. भिरभिरत्या डोळ्यांनी आजूबाजूचा आजमावलेला तो परिसर, आजही तसाच डोळ्यांसमोर उभा राहतो. कॉलेजचा पहिला दिवस, झालेल्या नवीन ओळखी, सगळी नवी नवलाई हरखणारी होती. घराबाहेर पडताना उराशी बाळगलेली स्वप्ने कुठेतरी साकार होऊ पाहत होती. नव्या शहरात, नव्या संस्कृतीत वावरण्यासाठी मन उत्सुक होते. हळूहळू तिथे रुळावत गेले. आणि सुरू झाला सर्वाधिक प्रतीक्षेत असणारा उच्च महाविद्यालयीन प्रवास.

                   कोणीतरी म्हटलंय की आपल्या या काळात आपण अनेक तात्पुरत्या स्वरूपाच्या लोकांना म्हणजेच मित्रमैत्रिणींना भेटतो. पण हेही तितकेच शाश्वत सत्य आहे की काही मौल्यवान लोकांना भेटतो. ते कधी आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग होऊन जातात समजत देखील नाही. मग सुरू होतो तो मैत्रीप्रवास. ते सोबत क्लास बुडवणे, शेवटच्या बाकावरची मस्ती, शिक्षकांना दिलेला त्रास, कॉलेजची उडविलेली मस्करी, चहाच्या टपरीवरच्या गप्पागोष्टी, कॉलेजच्या जोडप्यांची केलेली ती थट्टामस्करी, कॉलेजमध्ये कार्यक्रम असताना उत्साह शिगेला ठेवून ते फक्त डिजेवर नाचायला जाणे, हे सगळे कुठेतरी हरवतेय याची जाणीव मन पोखरतेय.

                   वास्तविकतेचे भानही नसलेले एक निराळेच कल्पनाविश्व होते ते दिवस. घरची आठवण आल्यानंतर पाणावणारे डोळे आणि ते बघून भावुक होणारे मित्रमैत्रिणी. घरून आणलेल्या खाऊवर सोबत मारलेला डल्ला, मेसचे जेवण आवडले नाहीतर रात्री अपरात्री शोध लावलेले ते निरनिराळे पदार्थ, इतर पूर्णवेळ उनाडक्या केल्याने परिक्षेवेळी येणार ताण अशावेळी एकमेकांना शिकवलेले ते धडे,  मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला तो वेळ, परिक्षेआधी ते रात्रभर जागरण आणि अशातही अभ्यास सोडून सुचणारे ते बाकीचे सुचणारे ते नसते उद्योग हे सगळे काही अविस्मरणीय आहे.

              या सगळ्या आठवणी शब्दांत मांडणे अशक्यच नाही का! याच काळात भेटलेले नमुने कधी जिवाभावाचे होऊन गेले कळालेच नाही. मैत्रीचा सुवर्णकाळ कोणता असेल तर तो हाच. कॉलेजनंतर नोकरीच्या प्रयत्नांत असणारा प्रत्येकजण, समजूतदारपणात हरवत चाललेला तो निखळपणा आणि अखेरच्या परीक्षांनंतर येणारी निरोपाची वेळ मन हेलावून सोडते. मित्रमैत्रिणींसोबत राहण्याची इच्छा घरी जाण्याच्या आतुरतेपुढे कमी पडते. आणि कुठेतरी थांबावे लागतेय याची जाणीव छळते.

             या कल्पनाविश्वातून वास्तवात परततांना खूप काही गोड-आंबट आठवणींचा खजिना आपल्यासोबत असतो. याच शिदोरीवर नवीन प्रवासात पाऊल टाकावे लागते. भेटत राहण्याचे घेतलेले वचन पूर्ण होण्याची शाश्वती नसतानाही एका इमारतीत सर्वांचे घर असण्याचे पाहिलेले स्वप्न एक मोरपिसाप्रमाणे विचारांवर अलगद सुखद फुंकर घालते. प्रत्येकाची वाट वेगळी झाली तरी मने मात्र तिथेच राहणार हे नक्कीच. अवर्णनीय असा हा प्रवास फक्त आठवणींतच……              


" स्मरता ते क्षण
डोळा येते पाणी
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी "

Comments

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ