हा सागरी किनारा……..

 

              एका शांत सायंकाळी सहजच किनाऱ्यावर फेरफटका मारावा. थंडावत चाललेल्या वाळूचा तो अलगद असा स्पर्श आणि अंगावर शहारे आणणारा तो शांत वारा अनुभवत घरट्याकडे परतणारा तो पक्ष्यांचा थवा नजरेस पडावा. किनाऱ्यालगतच्या झाडाच्या शहाळ्याचा आस्वाद घेत मावळतीच्या सूर्याकडे बघत किनाऱ्यावर धडकणाऱ्या त्या लाटांचा आवाज. अहाहा!... याहून विलोभनीय दृश्य काय असावे!

               अथांग असा क्षितिजावर पसरलेला हा समुद्र दुरून जरी शांत वाटत असला तरी किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेभान उसळलेल्या लाटा त्या आतल्या अशांततेचे प्रतीक असतात. असे म्हणतात की , “उथळ पाण्याला खळखळाट फार” पण हे समुद्राच्या उथळ लाटांना लागू होत नाही बरे. कारण किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांना सागरातल्या संघर्षाची चाहूल असतेच. त्याचा सुगावा कोणाला लागायला नको म्हणूनच कदाचित तो उथळपणा असावा.

               निश्चल असा वाटणारा तो महाकाय समुद्र कितीतरी गुपिते स्वतःमध्ये सामावून घेतो. कारण फक्त त्यालाच माहिती असते, शिखरावर असणारा भाग कधीतरी समुद्रतळाशी होता. किती विस्मयकारी आहे ना हा निसर्ग. भरतीच्या वेळी अत्यंत उत्तेजित होऊन किनारपट्टीकडे सरकणारा समुद्र ओहोटीच्या वेळी अगदी शांतपणे सर्वकाही सामावून घेतो. किती गूढ आणि रहस्यमयी असावा हा समुद्र ज्यातून रत्ने काढतांना देवांनाही समुद्रमंथन करावे लागले. सृष्टीच्या उत्पत्तीपासून विध्वंसाची ताकद ठेवणारा अन विषासहित अमृतही स्वतःच्या पोटात दडवून ठेवणारा हा महाकाय जलसाठा असा शांत अनुभवता यावा याहून सुंदर सुख नाही.

              किनाऱ्यावर येणारी प्रत्येक लाट काही क्षणांत ओसरते, परंतु त्या काही क्षणांच्या जीवनचक्रात शिंपले, मोती, शंखासारखे रत्नही सोबत वाहून आणते.  सूर्यकिरणांनी दिलेली सोनेरी वस्त्रे लेवून गुडूप अशा काळोखात जी चमकते ती लाट जणू आयुष्याचा खरा अर्थ सांगत असते. तो लाटांचा खळखळणारा आवाज मनाला संमोहित करत असतो. दिवसा सोनपावलांनी आलेली लाट रात्री चंदेरी प्रकाशात न्हाऊन निघते. एक लाट सरली की दुसरी तयारच असते. किनाऱ्याची तटबंदी भेदण्याची क्षमता असतानाही क्षणात ओसरण्याचे कसब मात्र फक्त लाटेकडेच असते.

               आपले आयुष्यही असेच असते नाही का? कधी भरती तर कधी ओहोटी. पण भरतीच्या वेळी उसळणाऱ्या लाटांनी ओहोटीची जाण ठेवली पाहिजे हो. समुद्रालाही त्याची मर्यादा ठाऊक असते. उगाच नाही मोसमी वाऱ्यांमुळे अस्थिर झालेला समुद्र नारळी पौर्णिमेपर्यंत स्थिरावत. तशाच आपणही आपल्या काही मर्यादा पाळायला हव्या नाही का!

              क्षितिज पादाक्रांत करतांना आपले पाऊल हे कोळ्यासारखे असावे. कारण फक्त कोळ्याला माहिती असते सागरात त्याची नाव कधी तग धरेल, पण त्यासोबतच समोर काळ बनून आलेल्या लाटांना फोडून काढण्याचे कसब फक्त कोळ्याकडे असते. तसेच आयुष्यात कितीही वादळे आली तरी तेथेच माडांसारखे पाय रोवून तग धरून ज्याने संयम राखला तोच आयुष्याचा भवसागर समर्थपणे पार करतो.

                                                                                                                                 ©वृषाली आघाव



Comments

Popular posts from this blog

ती….

सफरनामा भाग - १

प्रारंभ